जगातील सर्वात मोठी आणि यशस्वी व्यावसायिक क्रिकेट लीग म्हणून मान्यता मिळवलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या या वर्षीच्या हंगामाला सुरुवात होण्यास काही तास बाकी असतानाच जागतिक क्रीडा विश्वातील मॅच फिक्सिंगबाबत एक अहवाल समोर आल्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
अर्थात या मॅच फिक्सिंगबाबतच्या अहवालामध्ये फक्त क्रिकेट या क्रीडा प्रकाराचा नाही, तर जगाच्या पाठीवर खेळल्या जाणाऱ्या अनेक खेळांमध्ये कशाप्रकारे मॅच फिक्सिंगचे ग्रहण लागले आहे याचा उल्लेख या अहवालात केला आहे. या मॅच फिक्सिंग अहवालामध्ये भारतात खेळल्या गेलेल्या एकाही क्रिकेट सामन्याचा उल्लेख नसल्याने भारतासाठी ती दिलासादायक बाब आहे. भारताचा विचार करता क्रिकेट हा या देशाचा धर्म असल्याने आगामी काळामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतीय भूमीवरसुद्धा खेळवल्या जाणार असल्याने मॅच फिक्सिंगबाबतच्या या ताज्या चर्चेला निश्चितच महत्त्व द्यावे लागणार आहे. जागतिक क्रीडा क्षेत्रातील गैरप्रकार आणि अपप्रकार यावर लक्ष ठेवणाऱ्या स्पोर्टस इंटिग्रिटी या संस्थेने दीर्घकाळ अभ्यास करून हा अहवाल तयार केला असून त्यामध्ये जागतिक क्रीडा क्षेत्रात 152 देशातील क्रीडा प्रकारात सट्टेबाजी आणि अनियमितता तसेच मॅच फिक्सिंग झाल्याचा संशय या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
2022 या एका वर्षात खेळल्या गेलेल्या 13 क्रिकेट सामन्यांमध्येसुद्धा मॅच फिक्सिंग झाल्याचा संशय या अहवालात व्यक्त करण्यात आला असला तरी या सर्व अहवालामध्ये क्रिकेट या क्रीडा प्रकाराला सहावे स्थान देण्यात आले आहे. म्हणजे क्रिकेटपेक्षाही इतर क्रीडा प्रकारांमध्ये मॅच फिक्सिंगचे प्रमाण जास्त आहे. फुटबॉल, टेनिस आणि बास्केट बॉल या जागतिक स्तरावरील सर्वात जास्त लोकप्रिय खेळांनाही मॅच फिक्सिंगचे ग्रहण लागल्याचे लक्षात आले आहे. गेल्या वर्षभरात खेळवण्यात आलेल्या जागतिक पातळीवरील एकूण फुटबॉल सामन्यांपैकी 775 पेक्षा जास्त फुटबॉल सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. भारतासारख्या काही ठराविक देशांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या क्रिकेटपेक्षाही जगातील इतर देशांमध्ये जे खेळ सर्वात जास्त लोकप्रिय आहेत त्या खेळांमध्ये मॅच फिक्सिंग मोठ्या प्रमाणावर होत असल्याची ही बाब निश्चितच धक्कादायक आहे.
स्पोर्टस इंटिग्रिटी या संस्थेने फुटबॉल, बास्केटबॉल किंवा टेनिस या स्पर्धेमध्ये मॅच फिक्सिंगबाबत अधिक तपशील जरी जाहीर केला नसला, तरी अत्यंत चुरशीने आणि उत्कंठावर्धक वातावरणात खेळल्या जाणाऱ्या या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये बेटिंग आणि मॅच फिक्सिंगच्या माध्यमातून अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होते. फुटबॉल, टेनिस किंवा बास्केटबॉल खेळल्या जाणाऱ्या अनेक देशांनी बेटिंगला कायदेशीर मान्यता दिली असल्यामुळे त्याबाबत आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण एखाद्या सामन्यात बेटिंग ज्या बाजूने जास्त प्रमाणात झाले आहे त्याप्रमाणे सामन्याचा निकाल निश्चित करण्याची जी अनिष्ट प्रथा काही वर्षांपूर्वी सुरू झाली आहे त्यामुळे खेळातील उत्कंठा आणि सस्पेन्स संपून जातो. अत्यंत चुरशीने लढला गेलेला एखादा सामना म्हणून ज्या सामन्याचे वर्णन केले जाते तो सामना जर अशा प्रकारे फिक्स झाला आहे असे नंतरच्या काळात लक्षात आले तर प्रेक्षकांनी अनुभवलेल्या त्या चुरशीच्या क्षणांना काहीच अर्थ उरत नाही. महत्त्वाच्या क्रीडा प्रकाराच्या सामन्यावर झालेल्या बेटिंगच्या आधारे जर सामन्याचा निकाल निश्चित केला जात असेल, तर ती हजारो लाखो प्रेक्षकांची आणि चाहत्यांची एक घोर फसवणूकच मानावी लागते.
स्पोर्टस इंटिग्रिटी या संस्थेने आपल्या या अहवालाच्या निमित्ताने ही फसवणूकच जगासमोर आणली आहे. या निमित्ताने का होईना; पण क्रीडा प्रकाराला लागलेले हे ग्रहण बाजूला करण्याचा प्रयत्न झाला तर ती समाधानाची गोष्ट ठरणार आहे. केवळ क्रिकेट नव्हे तर सर्वच क्रीडा प्रकारांना लागलेले हे मॅच फिक्सिंगचे ग्रहण दूर करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियमक मंडळ आयसीसीच्या मदतीने प्रयत्न करणार असल्याची गोष्टही आता समोर आली आहे. 25 ते 30 वर्षांपूर्वी आणि नंतरच्याही कालावधीमध्ये भारतीय क्रिकेटला ज्याप्रकारे बेटिंग आणि मॅच फिक्सिंगने ग्रासले होते त्या काळामध्ये क्रिकेटची लोकप्रियताही झपाट्याने कमी झाली होती. कारण आपण जो सामना बघत आहोत त्या सामन्याचा निकाल जर आधीच निश्चित झाला असेल तर त्याला अर्थ काय, अशा प्रकारची मानसिक भावना हजारो क्रिकेट चाहत्यांची झाली होती. नंतरच्या कालावधीमध्ये बीसीसीआय आणि त्यांच्या अनेक अनुषंगिक संस्थांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून भारतीय क्रिकेटला मॅच फिक्सिंगपासून मुक्त केले. क्रिकेटमध्ये जेव्हा आयपीएल ही व्यवसाय क्रिकेट लीग सुरू झाली तेव्हासुद्धा पहिल्या काही वर्षांमध्ये श्रीसंत किंवा इतर काही खेळाडूंच्या माध्यमातून मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग असे काही प्रकार घडले होते. त्यावेळी चौकशीनंतर खेळाडूंवर कठोर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत तरी आयपीएल ही क्रिकेट लीग मॅच फिक्सिंग आणि बेटिंगपासून मुक्त आहे असे दिसते.
ज्याप्रकारे भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने आणि त्यांच्या सहकारी संस्थांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून भारतीय क्रिकेटला शुद्ध करण्याचा प्रयत्न केला तशाच प्रकारचे प्रयत्न जागतिक पातळीवर आता फुटबॉल टेनिस आणि बास्केटबॉल या महत्त्वाच्या क्रीडा प्रकारांबाबत करण्याची गरज आहे. स्पोर्टस इंटिग्रिटी या संस्थेने या अहवालात फक्त किती सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग झाले असावे याबाबत संशय व्यक्त केला आहे. या मॅच फिक्सिंगमध्ये गुंतलेली गुन्हेगारी तत्त्वे सावध होऊ नयेत म्हणून अहवालात कोणताही तपशील देण्यात आलेला नाही. साहजिकच आगामी कालावधीमध्ये स्पोर्टस इंटिग्रिटी या संस्थेला मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वच क्रीडा प्रकारातील नियामक संस्था कठोर कारवाई करून या क्रीडा प्रकारांना मॅच फिक्सिंगपासून मुक्त करतील अशी अशा करायला हवी. आणखी काही तासांतच भारतासाठी महत्त्वाचा असलेला आयपीएलचा नवीन हंगाम सुरू होणार आहे. त्या व्यतिरिक्त याच वर्षी भारतामध्ये झटपट क्रिकेटचा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे.
एकीकडे कोट्यवधी क्रिकेट रसिकांना आणि क्रीडा रसिकांना आंतरराष्ट्रीय सामन्यांची मेजवानी मिळत असतानाच हे सर्व सामने संपूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त वातावरणात आणि खऱ्याखुऱ्या चुरशीने खेळले जातील याची खात्री संबंधित सर्व संस्थांनी आता देण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा