लखनौ -पाकिस्तानात जन्मलेल्या परंतु झिम्बाव्बेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या सिकंदर रझाने आयपीएलच्या 21 सामन्यात आधी गोलंदाजी मग नंतर फलंदाजी अशी अष्टपैलू कामगिरी करताना लखनौ सुपर जायंट्सला पंजाब किंग्जवर रोमहर्षक विजय मिळवून दिला. लखनौचा कर्णधार के.एल.राहुलची 74 धावांची अर्धशतकीय खेळी मात्र या पराभवामुळे व्यर्थ ठरली.
लखनौचे 159 धावांचे माफक आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अथर्व तायडे शून्यावर बाद झाला. यदुवीर सिंगने त्याला बाद केले. त्यानंतर यदुवीरने त्यानंतर प्रभसिमरन सिंगला 4 धावांवर बाद करत पंजाबची अवस्था 2 बाद 17 अशी केली.
यानंतर मॅथ्यू शॉर्टने 22 चेंडूत आक्रमक 34 धावा केल्या. मात्र के गौतमने त्याचा अडसर दूर करत पंजाबला तिसरा धक्का दिला. यानंतर हरप्रीत सिंग भाटियाला क्रुणाल पांड्याने 22 धावांवर बाद केले. पंजाबची एकीकडे पडझड सुरू होती त्यावेळी सिकंदर एकटा भक्कमपणे संभाळत धावा जोडत होता. 18 षटकात सिकंदर बाद झाल्यानंतर शाहरुख खानने 23 धावांची महत्वपूर्ण खेळी करत संघाला तीन चेंडू बाकी असताना विजयी केले. लखनौकडून यदुवीरने सर्वाधिक 2 बळी घेतले.
तत्पूर्वी, शिखर धवनच्या अनुपस्थितीत पंजाबची धुरा संभाळणाऱ्या सॅम करणने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. त्यानंतर कर्णधार राहुलने 56 चेंडूंत 74 धावांची शानदार खेळी करताना लखनौला 20 षटकांत 8 गडी गमावून 159 धावांचा पल्ला गाठूण दिला.
राहुल बनला 4 हजारी मनसबदार
पंजाबविरुद्ध दमदार अर्धशतक करून कर्णधार राहुल हा आयपीएल इतिहासातील सर्वांत वेगवान 4000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आयपीएलमधील आपल्या 4000 धावा 105 डावात पूर्ण केल्या. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. त्याने 112 डावांत 4000 आयपीएल धावांचा टप्पा पार केला होता. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. त्याने हा टप्पा गाठण्यासाठी 114 डाव घेतले आहेत.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंट्स ः 20 षटकांत 8 बाद 159 (के.एल.राहुल 74-56 चेंडू, काईल मेयर्स 29; सॅम करन 3-31, कागिसो रबाडा 2-34, हरप्रित ब्रार 1-10, सिकंदर रझा 1-19, अर्शदिप सिंघ 1-22) पराभूत वि. पंजाब किंग्ज ः 19.3 षटकांत 8 बाद 161 (मॅट शॉर्ट 34, सिकंदर रझा 57-41 चेंडू, शाहरुख खान 23, हरप्रित भाटीया 22; यदुवीर सिंग 2-19, क्रिश्नाप्पा गौतम 1-31, कृणाल पंड्या 1-32, रवि बिश्नोई 2-18)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा