काही तालुक्यांमध्ये महाविकास आघाडीचाही मदत घेणार
सातारा-जिल्ह्यातील नऊ बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वर्भूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या येथील बैठकीत निवडणुकीची व्यूहरचना आखण्यात आली. ज्या तालुक्यात पक्षाचे काम कमी आहे, त्याठिकाणी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला तर जेथे पक्षाची ताकद अधिक आहे अशा तालुक्यांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक सोमवारी दुपारी राष्ट्रवादी भवनात झाली. या बैठकीस आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रभाकर देशमुख, जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित पाटणकर, बाळासाहेब सोळसकर, नंदकुमार मोरे, दीपक पवार, सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ, संदीप मांडवे, बंडा गोडसे, अभयसिंह जगताप, बाळासाहेब सावंत, तेजस शिंदे, राजकुमार पाटील उपस्थित होते. सातारा, कराड, पाटण, कोरेगाव, वडूज, फलटण, लोणंद, वाई, मेढा या बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. ज्या तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कमी आहे, तेथे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरण्याबाबत चर्चा झाली.
इच्छुकांचे अर्ज मागवून घेऊन त्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यानंतरच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकांची जबाबदारी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला. जिल्ह्यात विधानसभेच्या 2996 बुथ कमिट्या गठीत करण्यात आल्या आहेत. जेथे या कमिट्या सक्षम नाहीत, तेथे नव्याने कमिट्या गठीत करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पक्षांतर्गत निवडणुका, सभासद नोंदणी, राष्ट्रवादी युवकच्यावतीने शरद युवा संवाद अभियान राबवण्याबाबतही चर्चा झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा