आता शर्मा नव्हे वर्मा! मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीची जान बनलाय ‘तिलक’, पाहा आतापर्यंतची दमदार आकडेवारी
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 25वा सामना मंगळवारी (दि. 18 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात हैदराबाद संघाने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत 5 बाद 192 धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने वादळी अर्धशतक झळकावल्यानंतर तिलक वर्मा यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीने मुंबईला ही धावसंख्या गाठता आली. या हंगामात आतापर्यंत तिलक वर्मा हा मुंबईच्या फलंदाजीचा कणा राहिला आहे.
कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन व कॅमेरून ग्रीन यांनी केलेल्या दमदार फलंदाजीनंतर तिलक वर्मा याच्याकडून संघाला पुन्हा एकदा अपेक्षा होती. त्याने आपल्या संघ व चाहत्यांची ही अपेक्षा पूर्ण केली. त्याने अवघ्या 17 चेंडूवर 37 धावा करताना 2 चौकार व 4 षटकार ठोकले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 217 पेक्षाही जास्त राहिला.
या हंगामात तिलक हा मुंबईच्या फलंदाजीची धुरा वाहताना दिसतोय. आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 84 धावांची नाबाद खेळी केलेली. त्यानंतरही त्याने 22, 41 व 30 धावा करताना प्रत्येक वेळी आपले योगदान दिले. त्यानंतर या सामन्यात देखील त्याने संघासाठी दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा बनवल्या.
या हंगामात आतापर्यंत त्याने 53.50 च्या शानदार सरासरीने 214 धावा केल्या असून यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 158 असा जबरदस्त राहिला आहे. त्याने मागील वर्षी देखील मुंबईसाठी अशीच चमकदार कामगिरी करताना 36 पेक्षा जास्तच्या सरासरीने 397 धावा काढल्या होत्या.
संदर्भ : https://mahasports.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा