पिंपरी – अवकाळी पाऊस काळ बनून अवतरल्याचे किवळे परिसरात दिसून आले. मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वाऱ्यामुळे आडोशाला थांबलेल्या बांधकाम मजुरांवर काही टनाचे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या घटनेत तीन जण जखमी झाले. ही घटना कात्रज-देहूरोड द्रुतगती महामार्गावर किवळे येथे सोमवारी (दि. 17) सायंकाळी साडेचार ते पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. कटरच्या सहाय्याने होर्डिंग कापून, 8 क्रेन व एक जेसीबीचा वापर करून जखमी व मृतांना बाहेर काढण्यात आले.
अनिता उमेश रॉय (वय 45, देहूरोड), शोभा विनय टाक (वय 50, पारशी चाळ, देहूरोड), वर्षा केदारे (वय 40, शितलनगर, देहूरोड), भारती मंचळ (वय 30, शितलनगर, देहूरोड), राम प्रल्हाद आत्मज (वय 20, उत्तर प्रदेश) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
तर विशाल शिवशंकर यादव (वय 20, उत्तर प्रदेश),रहमद मोहमद अंसारी (वय 21, बेंगलोर-मुंबई हायवेजवळ, किवळे) व रिंकी दिलीप रॉय (वय 45, देहूरोड) हे या घटनेत जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, बंगळुरु महामार्गावर किवळे येथे एका बांधकाम व्यावसायिकाची जाहिरात असलेले होर्डिंग होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळी अचानक पाऊस सुरू झाल्याने बाजूच्या बांधकाम साइटवर काम करणाऱ्या मजुरांनी होर्डिंग खाली असलेल्या पंक्चरच्या दुकानाचा आडोसा घेतला.
त्यावेळी सोसाट्याचा वारा सुटल्याने शेकडो टनाचे भले मोठे लोखंडी होर्डिंग पंक्चरच्या दुकानावर कोसळले. त्यामुळे पंक्चरच्या दुकानात थांबलेले मजूर होर्डिंगखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले ल. कटरच्या सहाय्याने होर्डिंगचे रॉड तोडून जखमी मजुरांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच पाचजण मयत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तर, तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले. उल्लेखनीय बाब अशी की यापूर्वी देखील पिंपरी-चिंचवड शहरात वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून नागरिकांना जीव गमावावा लागला आहे. तरीदेखील यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे किवळे येथील घटनेने दिसून येत आहे.
संदर्भ: https://www.dainikprabhat.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा