इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 16 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग अशी ओळख असलेल्या आयपीएलच्या जवजवळ प्रत्येक हंगामात काही ना काही लहान-मोठे वाद समोर आले आहेत. आयपीएल आणि वाद ही गोष्ट चाहत्यांना काही नवीन नाही. यामध्ये स्पॉट फिक्सिंगशिवाय अनेक घोटाळेही समोर आले आहेत. पण इतक्या सर्व वादानंतरही आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे.
1.हरभजन आणि श्रीशांत विवाद – आयपीएलमधील पहिला वाद पहिल्या हंगामातच झाला होता. एस श्रीशांत आणि हरभजन यांच्यातील शाब्दिक भांडण क्वचितच कोणी क्रिकेट चाहते विसरले असतील. 25 एप्रिल,रोजी मोहालीमध्ये किंग्स इलेवन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यानंतर श्रीशांत रडत असल्याचे दिसले होते. यामागचे कारण म्हणजे हरभजन (Harbhajanslaps Sreesanth) याने श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. त्यानंतर हरभजनवर 11 सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.
2. ललित मोदीवर अजीवन बंदी- आयपीएलचा प्लॅन ललित मोदी यांचा आहे. ललित मोदी यांनीच आयपीएलच्या लीगची सुरुवात केली होती. पण 2010 मध्ये त्यांच्यावर पैशांचा गैरव्यवहार करण्याचा आरोप होता. त्यानंतर ललित मोदी यांना बीसीसीआयने निलंबीत केले. त्यानंतर तपासानंतर त्यांच्यावर अजीवन बंदी घालण्यात आली.मध्ये त्यांच्यावर पैशांचा गैरव्यवहार करण्याचा आरोप होता. त्यानंतर ललित मोदी यांना बीसीसीआयने निलंबीत केले. त्यानंतर तपासानंतर त्यांच्यावर अजीवन बंदी घालण्यात आली.
3. शेन वॉर्नची शिवीगाळ – IPL 2011 मध्ये, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉर्नने आरसीबीकडून सामना हरल्यानंतर राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय दीक्षित यांना जाहीरपणे शिवीगाळ केली. यानंतर संजय दिक्षित यांनी शेन वॉर्नविरोधात एफआयआरही दाखल केला होता.
4 . शाहरूख खानवर बंदी- आयपीएल 2012 मध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर कोलकता नाईट रायडर्सचा सहसंघमालक शाहरुख खानने वानखेडे स्टेडियमवरील सुरक्षारक्षकाचा अपमान केला. (Wankhede Stadium Shahrukh incident) या घटनेनंतर शाहरुख खानला वानखेडे स्टेडियमवर येण्यास चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. 2015 नंतरही ही बंदी उठवण्यात आली.
5. खेळाडूंचा रेव्ह पार्टीमध्ये सहभाग – साल 2012 च्या आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सचे दोन खेळाडू राहुल शर्मा आणि वेन पारनेल यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. हे दोन्ही खेळाडू एका रेव्ह पार्टीत पकडले गेले होते. आयपीएलच्या नियमांनुसार, स्पर्धेदरम्यान अशा कोणत्याही ठिकाणी जाणे बेकायदेशीर आहे.
6. स्पॉट फिक्सिंग- 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगची बाब समोर आली होती आणि सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला डाग लागला. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी राजस्थानचे तीन खेळाडू एस श्रीशांत, अजित चंदीला आणि अंकित चव्हाण यांनाही अटक केली होती. या तिन्हीही खेळाडूंवर अजीवन बंदी घालण्यात आली.
7. चेन्नई आणि राजस्थान संघावर बंदी – IPL 2013 लीगच्या सहाव्या सत्रातील भ्रष्टाचार व स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. तसेच हे दोन्ही संघ आयपीएलच्या 9व्या आणि 10व्या हंगामात खेळले नाहीत. 9 व्या (2016)आणि 10व्या (2017) हंगामात त्यांची जागा गुजरात लायन्स आणि पुणे सुपरजायंट्सने घेतली होती. चेन्नई सुपरकिंग्सचे मालक एन श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्राही यामध्ये दोषी आढळले होते.
8. विराट-गंभीर भिडले - 2013 साली आयपीएल दरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर यांच्यात मैदानावर जोरदार वादावादी झाली (Virat-Gambhir clash) होती. कोहलीने प्रदीप संगवानला लागोपाठ दोन षटकार मारले होते आणि तो तिसरा षटकार मारणार होता. मात्र तिसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात कोहली विकेट गमावून बसला. यानंतर केकेआरच्या खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. बाद झाल्यानंतर कोहली पॅव्हेलियनमध्ये परतत असताना गौतम गंभीरसोबत त्याची बाचाबाची झाली. त्यानंतर अंपायरने दोघांमधील प्रकरण शांत केले. या भांडणामुळे दोन्ही खेळाडूंवर लेव्हल 1 (अभद्र भाषा आणि अयोग्य हावभाव) चा आरोप लावण्यात आला.
9. पोलार्डनेही स्टार्कच्या दिशेने बॅट फेकली - साल 2014 आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असलेला किरॉन पोलार्ड आणि बंगळुरुकडून खेळत असलेला मिचेल स्टार्क यांच्यात मैदानातच वाद झाला होता.17 व्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मिचेल स्टार्कने किरॉन पोलार्डवर जबरदस्त बाउन्सर फेकला. या बाऊन्सरने पोलार्ड पूर्णपणे चुकला. यानंतर स्टार्कने पोलार्डला टोमणा मारला आणि दोघांमध्ये मैदानातच वाद झाला त्यानंतर पोलार्डने लगेचच (Pollard vs Starc Fight) प्रत्युत्तर दिले. स्टार्क पुढचा चेंडू टाकायला आला तेव्हा पोलार्ड क्रीझच्या बाहेर गेला. असे असतानाही त्याने चेंडू फेकला, त्यानंतर पोलार्डनेही त्याची बॅट स्टार्कच्या दिशेने फेकली. हे प्रकरण शांत करण्यासाठी ख्रिस गेलला यावे लागले. पोलार्डने याबाबत पंचांकडे तक्रारही केली. या वादामुळे पोलार्डला त्याच्या मॅच फीच्या 75 टक्के तर स्टार्कला 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
10. पोलार्ड आणि गेल वाद - आयपीएल 2015 मध्ये एका सामन्यादरम्यान किरॉन पोलार्डचा ख्रिस गेलसोबत वाद झाला. अंपायरने हस्तक्षेप करत पोलार्डला तोंड बंद ठेवण्यास सांगितले. त्यानंतर निषेध म्हणून पोलार्डने तोंडावर पट्टी लावून मैदानात प्रवेश केला, ज्याने सर्व प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. सामन्यातील सहकाऱ्यांशी काही बोलायचे असल्यास तो तोंडावरची पट्टी काढून बोलत असे. नंतर लगेच तो पट्टी पुन्हा एकदा तोंडावर लावत असे.
11. अन् कॅप्टन कूल झाला आक्रमक - आयपीएल 2019 च्या 12व्या हंगामात कॅप्टन कूल अशी ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी पहिल्यांदाच एका सामन्यादरम्यान रागात दिसला. आयपीएलच्या 12व्या हंगामातील 25 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात होता. चेन्नईला शेवटच्या तीन चेंडूत आठ धावांची गरज होती. यादरम्यान, मिचेल सँटनर फलंदाजीला आला, ज्याला पहिला चेंडू स्टोक्सने फूलटाॅस टाकला, ज्याला पंच उल्लास गांधी यांनी नो बॉल म्हटले, परंतु मैदानावरील दुसरे पंच ब्रूस ऑक्सनफोर्ड यांनी त्याचा निर्णय बदलला. यानंतर धोनीला राग आवरता आला नाही. पंचांच्या निर्णयावर नाराज धोनी डगआउट मधून उठून मैदानात गेला आणि पंचाबरोबर वाद घातला. जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते.
12. ऋषभ पंतने खेळाडूंना बोलवलं माघारी - आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात दिल्लीला विजयासाठी शेवटच्या षटकात 36 धावा करायच्या होत्या. रोव्हमन पॉवेलने ओबेड मॅकॉयच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. तिसरा चेंडू फुल टॉस होता. पॉवेलला वाटले की चेंडू कमरेच्या वर असल्याने नो-बॉल द्यायला हवा होता. पॉवेलने याबाबत अपील केले, पण मैदानावरील पंचांनी नो-बॉल देण्यास नकार दिला. यामुळे डगआउटमध्ये बसलेला दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत संतापला आणि त्याने दोन्ही फलंदाजांना ड्रेसिंग रुममध्ये माघारी बोलवलं. त्यानंतर त्याने सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांना मैदानाच्या आत पाठवले. पंचांनी समजावून त्यांना परत पाठवले. या हंगाम्यानंतर दिल्लीला विजयासाठी तीन चेंडूत तीन षटकारांची गरज होती. पण पुढच्या दोन चेंडूंवर दिल्लीला फक्त तीन धावा करता आल्या. शेवटच्या चेंडूवर रोव्हमॅन कॅचआऊट झाला अन् दिल्लीचा संघ 15 धावांनी पराभूत झाला.
Source- https://www.dainikprabhat.com/harbhajan-slaps-sreesanth-10-biggest-controversies-in-ipl-history/
संदर्भ - प्रभात (दि.1 April 2023)
संदर्भ - प्रभात (दि.1 April 2023)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा